Tuesday, October 25, 2022

आठवणीतली बॉल पॆन्स...!!


मी कधी त्याच्या सोबत पोझ देऊन फोटो काढलेला मला आठवत नाही.. कायम फोटो काढायला नाही म्हणणारा, आज त्या फोटो मध्ये खूपच photogenic दिसत होता..

अवघड वाटणाऱ्या परीक्षेला जाताना हमखास त्यानी दिलेलं पेन मी न विसरता कंपास बॉक्स मध्ये ठेवायचो. दर वर्षी एक पेन गिफ्ट मध्ये ठरलेलं होतं.. का कोण जाणे पण त्यानी दिलेलं प्रत्येक पेन मला माझ्यासाठी Lucky charm वाटायचं. अंधश्रध्दा अजून काय.. पण कितीही अवघड प्रश्न असला तरी प्रचंड आत्मविश्वासाने कंपास मधून पेन काढून अनेक उत्तरे लिहिलेली मला आठवतायत. अगदी आर्मी च्या इंटरव्ह्यू मध्ये सुद्धा. त्या अंधश्रध्देच्या जोडीला प्रचंड विश्वास असायचा आणि त्याचाच नेहमी विजय व्हायचा.

त्यानी दिलेला पांढरा शुभ्र फॉर्मल शर्ट माझ्या प्रत्येक इंटरव्ह्यूचा सोबती होता.. त्यावेळी white shirt म्हणजे एकदम भारी वाटायचा.. आणि त्या शर्टला एकदम कडक इस्त्री व्हायची त्यामुळे मला खूप भारी वाटायचं.

पूर्वी त्याच्या हातात सिगारेट असताना त्याला मी चिडवायचो "पेटवली का उदबत्ती" म्हणून. त्या उदबत्तीचा वास मला कधीच आवडला नाही पण त्यानी दिलेल्या प्रत्येक अत्तराचा सुवास मात्र उच्च असायचा. दिवाळीला आमच्या घरी ओवाळणीसाठी यायला कधीच चुकला नाही. एकमेव व्यक्ती जो न चुकता प्रत्येक दिवाळीत हमखास यायचाच. आधी बजाज चेतक वर आणि नंतर Wagon R मधून.. त्याची बजाज जाम भारी वाटायची मला.

आमच्या कुटुंबासोबत त्याचं कुटुंब खूप घट्ट जोडलं गेलं, हे केवळ त्याच्यामुळे आणि माझ्या बाबंमुळे. माझ्या बाबांची आणि त्याची खास मैत्री होती. घरी आल्यावर आधी "अण्णा नमस्कार" म्हणायचा आणि मगच त्याची entry व्हायची. आणि मग आम्हा पोरांच्या हातात पिशवी भरून खाऊ ठेवायचा.

त्याच्या सोबत रस्त्यानी फिरताना असं वाटायचं की आख्ख शहरच त्याला ओळखत असावं. सगळ्या जगाचा मित्र. विद्यार्थ्यांच्या मार्क्स शीटस् अट्टेस्ट करताना त्याचे हात कधीच दुखले नाहीत. गरजूंना मदत करताना त्यानी कधीच पुढे मागे बघितलं नाही. विचारांचा पक्का आणि ठाम. प्रसंगी खंबीर पण तेवढाच प्रेमळ.

बाप रे.. काही वर्ष मागे गेलो की कुठल्या कुठल्या आठवणी निघतात.. आता वाटतं की त्याच्या सोबत हट्टानी पेन गिफ्ट करताना एक तरी फोटो काढायला हवा होता.

विजू मामा, मला वाटलं होतं ह्या दिवाळीला मला एक छान पेन मिळेल गिफ्ट मध्ये. मागच्या वर्षी दिलं नाहीस. पण बहुतेक तुझ्या कडचा पेनांचा स्टॉक संपलेला होता. आता आहेत त्याच पेनांमध्ये आठवणींच्या रिफिल्स घालत राहीन.. पण तू कायम माझ्या सोबत राहशील. 

तू खरंच खूप छान दिसतोयस फोटो मध्ये. फक्त अत्तराच्या ऐवजी फुलांचा सुगंध दरवळतोय तुझ्या भोवती,आम्ही प्रेमानी तुला वाहिलेल्या फुलांचा. बाप्पा must be happy to have you in Heaven. जिकडे असशील तिकडे स्वतःची पण काळजी घे आता.. इकडची काळजी नको करुस.. आम्ही आहोत..

TAKE CARE ani माझा नमस्कार..!


तुझाच,

मंगेश..

2 comments:

  1. खूप सुन्दर व्यक्त झाला आहेस, मंगेश. मी तर कधी भेटले नाही त्यांना, पण तुझ्या भावांनाआणि शब्द घेऊन गेले त्यांच्या समोर. त्यांच्या स्मृतीला वन्दन. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो.

    ReplyDelete
  2. मंगेश, मामांच्या जाण्यामुळे तुला जाणवत असलेली पोकळी तुझ्या लेखात जाणवते आहे . ईश्वर त्यांना शांती देवो आणि तुमच्या कुटुंबाला हे सहन करण्याचे बळ..

    ReplyDelete