Saturday, April 12, 2014

फॅमिली ड्रामा...

आज काल संध्याकाळी घरातल्या हॉलमध्ये जायची सोयच नसते. आणि गेलो तरीही टी.व्ही.समोर जाऊच नये असे वाटते. आणि टी.व्ही. चुकून जरी चालू केला तरी पुढच्या ३ तासात आपल्या हातात रिमोट येईल याची कहीच शाश्वती नसते. मग ते नेहमीचेच फॅमिली ड्रामा पुन्हा चालू.

सगळ्या चॅनल्सवर कुठली ना कुठली फॅमिली सिरियल, आणि ओढून ताणून सगळ्यांची स्टोरी शेवटी एकच. विषय मांडण्याची पध्दत आणि ते मांडणारे कलाकार, हाच काय तो फरक. प्रत्येक स्टोरी मध्ये एक सून, एक सासू, त्यांचा परीवार, त्यांच्यातले वाद, किमान एक तरी विवाह बाह्य संबंध हे असले विषय आवर्जुन असतातच. आणि २-३ वर्षांनी जेव्हा सिरियल संपते तेव्हा ऍज युज्वल हॅप्पी एंडींग. आपण साजरे करतो ते सगळे सण तिथेही साजरे होतात आणि ते देखील बरोब्बर त्याच वेळी. सगळ्यात जास्त आश्चर्य ह्या गोष्टीचं वाटतं, की घरातील सर्व मंडळी, विशेषत: स्त्रिया ह्या विषयाशी इतक्या एकरूप होतात की सिरियलचा एक जरी भाग बघायचा राहून गेला तरी त्यांना झोप लागत नाही. प्रेक्षकांनी अश्या समस्येत जास्त काळ जगणं योग्य नाही हे बहुधा निर्मात्यांच्या ध्यानात आले असावे म्हणूनच कदाचित ह्या सर्व सिरियल्स दिवसातून कमीत कमी ४ ते ५ वेळा तरी प्रेक्षकांकरिता दाखविल्या जातात. घराघरांत तरीही दूध ऊतू जातंच, पोळी तव्यावर करपतेच आणि शेवटी स्वत:च्या घरी देखील त्या सिरियल प्रमाणेच वाद चालू होतो.

दुसरी आश्चर्याची बाब म्हणजे, सर्व प्रेक्षकांना सिरियल्स मधील घडामोडी आणि त्यांच्या स्वत:च्या घरातील परिस्थिती ह्यांत इतके साधर्म्य वाटते की जणू काही आपल्याच कुटुंबाचं चित्र उभं केलंय असं त्यांना वाटू लागतं. घरांमधून दररोज होणारे वाद वाढू लागतात, त्या वादात एकमेकांशी संवाद साधताना सिरियल मधील कुठल्यातरी एका डायलॉगचा वापर हमखास होतोच. समोरचा आपल्याशी कसं वागेल ह्याचं कंक्लुजन आधीच काढलं जातं, बारीक-सारीक गोष्टींचे उगाच चुकीचे अर्थ घेतले जाऊ लागतात, गैरसमज वाढत जातात (अर्थात हे सर्व होतं ते सिरियल मधील एखाद्या प्रसंगाला आठवून आणि त्याच्याशी सत्य परिस्थितीचं साधर्म्य मांडून) आणि मग सुरू होतो खरा फॅमिली ड्रामा..

प्रत्येक पत्नीला सिरियल मधल्या नव-यासारखा आयडियल नवरा आणि प्रत्येक पतीला आयडियल बायको हवी असते. त्या सिरियल मधल्या नव-यासारखा आपला नवरा रोमॅंटिक का नाही किंवा त्या बायकोसारखी आपली बायको "आदर्श पत्नी" का नाही असल्या फालतू आणि निरर्थक प्रश्नांची मग लाईनच लागते. प्रत्येक सुनेला आपली सासू तशीच आहे किंवा प्रत्येक सासूला आपली सून तशीच आहे असं वाटू लागतं. घराघरांत नको ती एक्स्पेक्टेशन्स सेट होऊ लागतात आणि आदर सन्मान ढासळू लागतो. एकमेकांशी मिळुनमिसळून राहण्यापेक्षा कुरघोडी कशी करता येईल याचे विचार जास्त होऊ लागतात. प्रत्येकानी कितीही नाकारलं तरी हे सत्य आहे.

आणि गंमत म्हणजे ह्या सर्व गोष्टींना कुठलाच चॅनल अपवाद नाही. नाही म्हणायला १०० सिरियल्स मागे एखादी अपवादात्मक अशी चांगली सिरियल येते पण ती सुरू कधी होते आणि संपते कधी ह्याचा पत्ताच लागत नाही. मनात विचार येतो, कुठे गेले गंगाधर टिपरे? कुठे गेल्या रमाबाई रानडे? मोगली, गोट्या आणि बोक्या सातबंडे कुठे हरवले सगळे? खरंच तो काळ पुन्हा येईल का आणि आपल्या भावनांचं बाजारीकरण थांबून बोधपर गोष्टींना प्राधान्य मिळेल का?

-मंगेश केळकर
(१२ - एप्रिल - २०१४)