Sunday, June 7, 2020

अळूवडी आणि आजी

आज बरेच दिवसांनी डोक्यात लिखाणाचा किडा घुसला. निमित्त म्हणजे बायकोनी केलेली अळूवडी.
नाही, खरं कारण म्हणजे तिने त्यानिमित्तानं सांगितलेल्या तिच्या आजीच्या आठवणी.


आई बाबा बहीण भाऊ ह्यांच्या पलीकडे आपल्याला जाणून घेणारं आणि वेळप्रसंगी आपल्यासाठी सर्वस्व झोकून देणारं एक नातं म्हणजे "आजी". किंबहुना नात्याच्या पलीकडचं असं काहीतरी.
आपल्यापेक्षा किमान ४०-४५ पावसाळे जास्त बघितलेलं हे असं एकच व्यक्तिमत्त्व आहे कि ५ वर्षांची नातवंडं सुद्धा "अगं" आजी किंवा "ए" आजी अशी एकेरी हाक मारून "तिला" आपल्या पठडीत बसवतात आणि महत्त्वाचं म्हणजे ६० वर्षांची "ती" पण मोठ्या उत्साहात ५ वर्षांची होऊन जाते.

बायको म्हणाली, आज तिला तिच्या आजीची खूप आठवण येत्ये कारण "अळूवडी म्हणजे माझ्या आजीची एकदम सिग्नेचर डिश. आज ती हवी होती". लॉक-डाऊन मध्ये घरी बायकोनी जेवढे नवीन पदार्थ केले त्यातल्या जवळपास सगळ्याच पदार्थांना ती असं म्हणाली 😀 तिच्या आजीला जाऊन साधारण ८-९ वर्षं झाली असतील. म्हणजे मागची एवढी वर्षं आजीच्या हातचं काही खाल्लं नाही, पण चव अजून लक्षात आहे.
असं म्हणतात कि एखादी गोष्ट जेव्हा आपल्या पाचही इंद्रियांना खूष करते तेव्हा ती गोष्ट जन्मभर लक्षात राहते.
ही अळूवडी हे त्याचंच एक उदाहरण आहे. बायकोला म्हटलं तुझी आजी लोणचं कसं करायची गं? २ मिनिटं तिने माझ्याकडे बघितलं आणि म्हणाली येताना ४ कैऱ्या घेऊन ये 😂

काही पदार्थ असे असतात की आयुष्यात ते फक्त आजीच्या हातचेच लक्षात राहतात. उदाहरणार्थ हि अळूवडी, लोणचं, पापड, पोहे, साबूदाण्याची खिचडी, रव्याचे किंवा बेसनाचे लाडू, चिवडा.. वा, मला माझी आजी आणि मे  महिन्याच्या सुट्टीमध्ये पेणला (म्हणजे माझ्या आजोळी) केलेली धमाल आठवते. सकाळी कधीही "उठ आता" म्हणून मागे नं लागणारी, हवे ते पदार्थ कुठलीही कारणं नं देता दिवसाच्या कुठल्याही प्रहरी करून देणारी, आजोबांपर्यंत आमची कुठलीही तक्रार कधीही पोहोचू नं देणारी आजी.

प्रत्येक माणसाच्या आयुष्यात "आजी" हा एक अविभाज्य घटक असतो आणि सदैव राहील.

अळूवडी खाऊन झाल्यावर खरंतर मलाही माझ्या आजीची आठवण झाली. सगळ्या आज्ज्या अश्याच चवीची अळूवडी कशी करू शकतात ह्याचं जरा आश्चर्यच वाटलं. पण नंतर लक्षात आलं, गायीच्या पोटी ३३ कोटी देव असले तरी खरा देव हा एकच आहे. ३३ कोटी तर त्याची रूपं आहेत. आजीचं पण असंच काहिसं असावं कदाचित. आज आजी आमच्यात नाही, पण तिची चव पिढ्यानं पिढ्या अशीच राहील ह्याची खात्री पटली.

आजीला साष्टांग नमस्कार.. जिकडे असशील तिकडे सुखात राहा.. तुझी नातवंडं आणि त्यांची नातवंडं पण तुला कधी विसरणार नाहीत, कारण तीच चव अजून जिभेवर रेंगाळते आहे आणि पुढेही राहील.


-मंगेश केळकर
(०७-जून-२०२०)