Tuesday, October 25, 2022

आठवणीतली बॉल पॆन्स...!!


मी कधी त्याच्या सोबत पोझ देऊन फोटो काढलेला मला आठवत नाही.. कायम फोटो काढायला नाही म्हणणारा, आज त्या फोटो मध्ये खूपच photogenic दिसत होता..

अवघड वाटणाऱ्या परीक्षेला जाताना हमखास त्यानी दिलेलं पेन मी न विसरता कंपास बॉक्स मध्ये ठेवायचो. दर वर्षी एक पेन गिफ्ट मध्ये ठरलेलं होतं.. का कोण जाणे पण त्यानी दिलेलं प्रत्येक पेन मला माझ्यासाठी Lucky charm वाटायचं. अंधश्रध्दा अजून काय.. पण कितीही अवघड प्रश्न असला तरी प्रचंड आत्मविश्वासाने कंपास मधून पेन काढून अनेक उत्तरे लिहिलेली मला आठवतायत. अगदी आर्मी च्या इंटरव्ह्यू मध्ये सुद्धा. त्या अंधश्रध्देच्या जोडीला प्रचंड विश्वास असायचा आणि त्याचाच नेहमी विजय व्हायचा.

त्यानी दिलेला पांढरा शुभ्र फॉर्मल शर्ट माझ्या प्रत्येक इंटरव्ह्यूचा सोबती होता.. त्यावेळी white shirt म्हणजे एकदम भारी वाटायचा.. आणि त्या शर्टला एकदम कडक इस्त्री व्हायची त्यामुळे मला खूप भारी वाटायचं.

पूर्वी त्याच्या हातात सिगारेट असताना त्याला मी चिडवायचो "पेटवली का उदबत्ती" म्हणून. त्या उदबत्तीचा वास मला कधीच आवडला नाही पण त्यानी दिलेल्या प्रत्येक अत्तराचा सुवास मात्र उच्च असायचा. दिवाळीला आमच्या घरी ओवाळणीसाठी यायला कधीच चुकला नाही. एकमेव व्यक्ती जो न चुकता प्रत्येक दिवाळीत हमखास यायचाच. आधी बजाज चेतक वर आणि नंतर Wagon R मधून.. त्याची बजाज जाम भारी वाटायची मला.

आमच्या कुटुंबासोबत त्याचं कुटुंब खूप घट्ट जोडलं गेलं, हे केवळ त्याच्यामुळे आणि माझ्या बाबंमुळे. माझ्या बाबांची आणि त्याची खास मैत्री होती. घरी आल्यावर आधी "अण्णा नमस्कार" म्हणायचा आणि मगच त्याची entry व्हायची. आणि मग आम्हा पोरांच्या हातात पिशवी भरून खाऊ ठेवायचा.

त्याच्या सोबत रस्त्यानी फिरताना असं वाटायचं की आख्ख शहरच त्याला ओळखत असावं. सगळ्या जगाचा मित्र. विद्यार्थ्यांच्या मार्क्स शीटस् अट्टेस्ट करताना त्याचे हात कधीच दुखले नाहीत. गरजूंना मदत करताना त्यानी कधीच पुढे मागे बघितलं नाही. विचारांचा पक्का आणि ठाम. प्रसंगी खंबीर पण तेवढाच प्रेमळ.

बाप रे.. काही वर्ष मागे गेलो की कुठल्या कुठल्या आठवणी निघतात.. आता वाटतं की त्याच्या सोबत हट्टानी पेन गिफ्ट करताना एक तरी फोटो काढायला हवा होता.

विजू मामा, मला वाटलं होतं ह्या दिवाळीला मला एक छान पेन मिळेल गिफ्ट मध्ये. मागच्या वर्षी दिलं नाहीस. पण बहुतेक तुझ्या कडचा पेनांचा स्टॉक संपलेला होता. आता आहेत त्याच पेनांमध्ये आठवणींच्या रिफिल्स घालत राहीन.. पण तू कायम माझ्या सोबत राहशील. 

तू खरंच खूप छान दिसतोयस फोटो मध्ये. फक्त अत्तराच्या ऐवजी फुलांचा सुगंध दरवळतोय तुझ्या भोवती,आम्ही प्रेमानी तुला वाहिलेल्या फुलांचा. बाप्पा must be happy to have you in Heaven. जिकडे असशील तिकडे स्वतःची पण काळजी घे आता.. इकडची काळजी नको करुस.. आम्ही आहोत..

TAKE CARE ani माझा नमस्कार..!


तुझाच,

मंगेश..

Sunday, June 7, 2020

अळूवडी आणि आजी

आज बरेच दिवसांनी डोक्यात लिखाणाचा किडा घुसला. निमित्त म्हणजे बायकोनी केलेली अळूवडी.
नाही, खरं कारण म्हणजे तिने त्यानिमित्तानं सांगितलेल्या तिच्या आजीच्या आठवणी.


आई बाबा बहीण भाऊ ह्यांच्या पलीकडे आपल्याला जाणून घेणारं आणि वेळप्रसंगी आपल्यासाठी सर्वस्व झोकून देणारं एक नातं म्हणजे "आजी". किंबहुना नात्याच्या पलीकडचं असं काहीतरी.
आपल्यापेक्षा किमान ४०-४५ पावसाळे जास्त बघितलेलं हे असं एकच व्यक्तिमत्त्व आहे कि ५ वर्षांची नातवंडं सुद्धा "अगं" आजी किंवा "ए" आजी अशी एकेरी हाक मारून "तिला" आपल्या पठडीत बसवतात आणि महत्त्वाचं म्हणजे ६० वर्षांची "ती" पण मोठ्या उत्साहात ५ वर्षांची होऊन जाते.

बायको म्हणाली, आज तिला तिच्या आजीची खूप आठवण येत्ये कारण "अळूवडी म्हणजे माझ्या आजीची एकदम सिग्नेचर डिश. आज ती हवी होती". लॉक-डाऊन मध्ये घरी बायकोनी जेवढे नवीन पदार्थ केले त्यातल्या जवळपास सगळ्याच पदार्थांना ती असं म्हणाली 😀 तिच्या आजीला जाऊन साधारण ८-९ वर्षं झाली असतील. म्हणजे मागची एवढी वर्षं आजीच्या हातचं काही खाल्लं नाही, पण चव अजून लक्षात आहे.
असं म्हणतात कि एखादी गोष्ट जेव्हा आपल्या पाचही इंद्रियांना खूष करते तेव्हा ती गोष्ट जन्मभर लक्षात राहते.
ही अळूवडी हे त्याचंच एक उदाहरण आहे. बायकोला म्हटलं तुझी आजी लोणचं कसं करायची गं? २ मिनिटं तिने माझ्याकडे बघितलं आणि म्हणाली येताना ४ कैऱ्या घेऊन ये 😂

काही पदार्थ असे असतात की आयुष्यात ते फक्त आजीच्या हातचेच लक्षात राहतात. उदाहरणार्थ हि अळूवडी, लोणचं, पापड, पोहे, साबूदाण्याची खिचडी, रव्याचे किंवा बेसनाचे लाडू, चिवडा.. वा, मला माझी आजी आणि मे  महिन्याच्या सुट्टीमध्ये पेणला (म्हणजे माझ्या आजोळी) केलेली धमाल आठवते. सकाळी कधीही "उठ आता" म्हणून मागे नं लागणारी, हवे ते पदार्थ कुठलीही कारणं नं देता दिवसाच्या कुठल्याही प्रहरी करून देणारी, आजोबांपर्यंत आमची कुठलीही तक्रार कधीही पोहोचू नं देणारी आजी.

प्रत्येक माणसाच्या आयुष्यात "आजी" हा एक अविभाज्य घटक असतो आणि सदैव राहील.

अळूवडी खाऊन झाल्यावर खरंतर मलाही माझ्या आजीची आठवण झाली. सगळ्या आज्ज्या अश्याच चवीची अळूवडी कशी करू शकतात ह्याचं जरा आश्चर्यच वाटलं. पण नंतर लक्षात आलं, गायीच्या पोटी ३३ कोटी देव असले तरी खरा देव हा एकच आहे. ३३ कोटी तर त्याची रूपं आहेत. आजीचं पण असंच काहिसं असावं कदाचित. आज आजी आमच्यात नाही, पण तिची चव पिढ्यानं पिढ्या अशीच राहील ह्याची खात्री पटली.

आजीला साष्टांग नमस्कार.. जिकडे असशील तिकडे सुखात राहा.. तुझी नातवंडं आणि त्यांची नातवंडं पण तुला कधी विसरणार नाहीत, कारण तीच चव अजून जिभेवर रेंगाळते आहे आणि पुढेही राहील.


-मंगेश केळकर
(०७-जून-२०२०)

Sunday, September 25, 2016

आरक्षण...

आरक्षण आणि त्यासाठी निघणारे मोर्चे हा सध्याचा खूप गाजणारा मुद्दा..

असंख्य धर्म जाती जमाती आणि वर्ण असलेल्या ह्या हिंदुस्थानात आरक्षणासाठी खरंच कुठलं प्रमाण लावावं हे एक मोठ्ठ कोडंच आहे... आपापल्या परीने मोर्चे काढले, आंदोलने केली आणि सरकारला वेठीस धरलं कि सगळं साध्य होतं असं मानणारा आपला हा २१ व्या शतकातला सुशिक्षित समाज इतर महत्त्वांच्या मुद्दयांवर लढण्यासाठी एकत्र का येत नाही...

अल्पसंख्यांक म्हणून आरक्षण मागताना मोर्च्यात लाखो लोक येतात मग हे अल्पसंख्य कसे?
स्वत:ला मागास म्हणवणारा समाज जेव्हा राजकारणातील आणि सरकारमधील बहुतांशी सर्व महत्त्वाची आणि उच्च पदे आणि नोकऱ्या मिळवतो तेव्हा तो समाज मागास कसा?


खरं तर खूप साधे सोपे आणि सरळसोट उत्तर असणारे प्रश्ण आहेत पण राजकीय दबाव आणि मतपेटयांचा खेळ खेळण्यासाठी हे सगळं खूप complicate करून ठेवलंय...

मी "ओपन कॅटेगरी" मध्ये असल्यामुळे हे बोलतोय असं वाटणं सहाजिक आहे... पण महत्त्वाचा मुद्दा म्हणजे खरंच धर्म आणि जातीच्या नावावर आरक्षण दिलं पाहिजे का ? कि "आर्थिक परिस्थिती" किंवा तत्सम निकषावर आरक्षण आधारित असावे? बाबासाहेबांनी दिलेले संविधानातील मुद्दे आणि तरतुदी काळानुसार आणि वाढत्या लोकसंख्येनुसार बदलायला नकोत का?
शिक्षणसंस्था, आर्थिक संस्था, सामाजिक न्याय संस्था आणि इतर महत्त्वाची डीपार्टमेंट्स इत्यादी ठिकाणी खरंतर knowledgeable आणि sincere व्यक्ती असावी, मग ती व्यक्ती कुठल्याही जातीची किंवा धर्माची असो, पण फक्त स्वकर्तृत्वावर स्वत:ला सिद्ध केलेली असावी.

मी कुठल्याही धर्माच्या किंवा जातीच्या विरोधात नाही, ओपन कॅटेगरी सोबतच ओपन माईंडेड देखील आहे..
इतरांप्रमाणेच काही गोष्टी मलाही खटकतात आणि अश्या गोष्टी आपण एकटे सोडवू शकत नाही हे चांगलं माहित असल्याने इतर middle class माणसांप्रमाणे हतबल होऊन, फक्त असे blog लिहून किंवा फेसबुकवर comments  करून शांत बसतो आणि शेवटी मनाला आणि बुद्धीला न पटणाऱ्या गोष्टींना "live & let live" असा म्हणून नेहमीप्रमाणे "let go" करतो...


-मंगेश केळकर
(२५ सप्टेंबर २०१६)

Saturday, April 12, 2014

फॅमिली ड्रामा...

आज काल संध्याकाळी घरातल्या हॉलमध्ये जायची सोयच नसते. आणि गेलो तरीही टी.व्ही.समोर जाऊच नये असे वाटते. आणि टी.व्ही. चुकून जरी चालू केला तरी पुढच्या ३ तासात आपल्या हातात रिमोट येईल याची कहीच शाश्वती नसते. मग ते नेहमीचेच फॅमिली ड्रामा पुन्हा चालू.

सगळ्या चॅनल्सवर कुठली ना कुठली फॅमिली सिरियल, आणि ओढून ताणून सगळ्यांची स्टोरी शेवटी एकच. विषय मांडण्याची पध्दत आणि ते मांडणारे कलाकार, हाच काय तो फरक. प्रत्येक स्टोरी मध्ये एक सून, एक सासू, त्यांचा परीवार, त्यांच्यातले वाद, किमान एक तरी विवाह बाह्य संबंध हे असले विषय आवर्जुन असतातच. आणि २-३ वर्षांनी जेव्हा सिरियल संपते तेव्हा ऍज युज्वल हॅप्पी एंडींग. आपण साजरे करतो ते सगळे सण तिथेही साजरे होतात आणि ते देखील बरोब्बर त्याच वेळी. सगळ्यात जास्त आश्चर्य ह्या गोष्टीचं वाटतं, की घरातील सर्व मंडळी, विशेषत: स्त्रिया ह्या विषयाशी इतक्या एकरूप होतात की सिरियलचा एक जरी भाग बघायचा राहून गेला तरी त्यांना झोप लागत नाही. प्रेक्षकांनी अश्या समस्येत जास्त काळ जगणं योग्य नाही हे बहुधा निर्मात्यांच्या ध्यानात आले असावे म्हणूनच कदाचित ह्या सर्व सिरियल्स दिवसातून कमीत कमी ४ ते ५ वेळा तरी प्रेक्षकांकरिता दाखविल्या जातात. घराघरांत तरीही दूध ऊतू जातंच, पोळी तव्यावर करपतेच आणि शेवटी स्वत:च्या घरी देखील त्या सिरियल प्रमाणेच वाद चालू होतो.

दुसरी आश्चर्याची बाब म्हणजे, सर्व प्रेक्षकांना सिरियल्स मधील घडामोडी आणि त्यांच्या स्वत:च्या घरातील परिस्थिती ह्यांत इतके साधर्म्य वाटते की जणू काही आपल्याच कुटुंबाचं चित्र उभं केलंय असं त्यांना वाटू लागतं. घरांमधून दररोज होणारे वाद वाढू लागतात, त्या वादात एकमेकांशी संवाद साधताना सिरियल मधील कुठल्यातरी एका डायलॉगचा वापर हमखास होतोच. समोरचा आपल्याशी कसं वागेल ह्याचं कंक्लुजन आधीच काढलं जातं, बारीक-सारीक गोष्टींचे उगाच चुकीचे अर्थ घेतले जाऊ लागतात, गैरसमज वाढत जातात (अर्थात हे सर्व होतं ते सिरियल मधील एखाद्या प्रसंगाला आठवून आणि त्याच्याशी सत्य परिस्थितीचं साधर्म्य मांडून) आणि मग सुरू होतो खरा फॅमिली ड्रामा..

प्रत्येक पत्नीला सिरियल मधल्या नव-यासारखा आयडियल नवरा आणि प्रत्येक पतीला आयडियल बायको हवी असते. त्या सिरियल मधल्या नव-यासारखा आपला नवरा रोमॅंटिक का नाही किंवा त्या बायकोसारखी आपली बायको "आदर्श पत्नी" का नाही असल्या फालतू आणि निरर्थक प्रश्नांची मग लाईनच लागते. प्रत्येक सुनेला आपली सासू तशीच आहे किंवा प्रत्येक सासूला आपली सून तशीच आहे असं वाटू लागतं. घराघरांत नको ती एक्स्पेक्टेशन्स सेट होऊ लागतात आणि आदर सन्मान ढासळू लागतो. एकमेकांशी मिळुनमिसळून राहण्यापेक्षा कुरघोडी कशी करता येईल याचे विचार जास्त होऊ लागतात. प्रत्येकानी कितीही नाकारलं तरी हे सत्य आहे.

आणि गंमत म्हणजे ह्या सर्व गोष्टींना कुठलाच चॅनल अपवाद नाही. नाही म्हणायला १०० सिरियल्स मागे एखादी अपवादात्मक अशी चांगली सिरियल येते पण ती सुरू कधी होते आणि संपते कधी ह्याचा पत्ताच लागत नाही. मनात विचार येतो, कुठे गेले गंगाधर टिपरे? कुठे गेल्या रमाबाई रानडे? मोगली, गोट्या आणि बोक्या सातबंडे कुठे हरवले सगळे? खरंच तो काळ पुन्हा येईल का आणि आपल्या भावनांचं बाजारीकरण थांबून बोधपर गोष्टींना प्राधान्य मिळेल का?

-मंगेश केळकर
(१२ - एप्रिल - २०१४)

Friday, November 8, 2013

राशीभविष्य...!!!

राशीभविष्य... खरं तर ही संकल्पनाच मला कळत नाही अजुनही... मी ह्या बाबतीत अज्ञानी आहे असं म्हटलं तरी हरकत नाही.. इथे कोणासही दुखवायचा हेतु नाही पण जगातला प्रत्येक माणूस कुठल्या नं कुठल्या राशीमध्ये फिट होतो ते कसंकाय हेच कळत नाही मला...

ह्या राशीची माणसं अशी असतात त्या राशीची माणसं तशी असतात असं नेहमी ऐकण्यात येतं, पण ह्याचं गणित कसं मांडतात हे मला अजुनही कळलेलं नाही. उदाहरणच द्यायचं झालं तर, १०० माणसं १२ राशींमध्ये विभागली तर साधारणपणे ८-९ माणसांचं भविष्य एक समान असतं असं म्हणायला हरकत नाही. पण तसं खरंच असतं का? अर्थात नाही... असं असतं तर या जगात कित्येक लता दिदी आणि कित्येक साचीन तेंडुलकर जन्मले असते.. हो की नाही...



आपण एखाद्या माणसाबद्दल कधीतरी म्हणतो की "आपल्या राशीलाच लागलाय" म्हणजे त्याचा नेमका अर्थ काय घ्यायचा? जन्मपत्रिका बघून लग्न ठरले असेल तर आपण असं म्हणतो का कि "हे दोघे एकमेकांच्या राशीलाच पूजले आहेत" म्हणून.. नाही ना?
चंद्र-सूर्याच्या भ्रमणाचा प्रभाव माणसाच्या प्रकृतीवर होतो हे मान्य आहे पण हे ग्रह तारे आमचं भविष्य कसं ठरवू शकतात हे मात्र एक कोडंच आहे.

"माणसानं केलेल्या एखाद्या चुकीच्या कृतीमुळे त्याला भोगावे लागणारे त्रास हे ग्रह-ता-यांच्या भ्रमणावर कसे काय ठरू शकतात?" असा प्रश्न केला असता त्याच्या पत्रिकेत हा दोष आहे किंवा तो योग आहे असं समजतं आणि त्या दोषामुळेच त्याच्याकडून असे कृत्य घडले अशी उत्तरेही मिळतात. मग त्या ग्रहाची पूजा किंवा शांत करावी लागते जेणेकरून त्याचा त्रास होत नाही... हे असं कसं शक्य आहे? आपण पूजा केली किंवा शांत केली की तो ग्रह शांत होतो का? किंवा आपली भ्रमण कक्षा बदलतो का?

"शनीची साडेसाती" हे कधीही न उलगडलेलं आणि खरंतर कधिही न उलगडणारं एक कोडंच आहे. एखादा ग्रह वक्री आहे म्हणजे नक्की काय? नुकत्याच जन्मलेल्या बाळाची पत्रिका बनवली जाते आणि मोठा होऊन ते कोण बनणार हे सांगितलं जातं.. लाखातली एखादीच व्यक्ती तशी बनत असेल.. बिचारं बाळ रांगायलाही लागलेलं नसतं आणि त्याच्या नावानी त्याचे आई वडील कोणतीतरी पूजा करत असतात शनी किंवा राहू केतू ला खुश ठेवण्यासाठी...

एखाद्या व्यक्तीला मंगळ असतो म्हणजे नेमकं काय असतं? खरंतर "मंगल" म्हणजे शुभ... म्हणजे या अर्थाने मंगळ असणारी व्यक्ती खरंतर नशीबवानच म्हणायला हवी... आणि हा मंगळ जर अशुभ मानला जात असेल तर इस्रोनी याच मंगळावर यान पाठवताना एखादा शुभ-मुहूर्त काढला असेल का? मंगळ अशुभ का आहे हे जाणून घेणारी एखादी यंत्रणा या यानावर कार्यरत असावी अशी माझी मनापासून इच्छा आहे...

२१व्या शतकात जिथे माणूस मंगळावर आणि चंद्रावर स्वारी करत आहे तिथेच तो शुभ आणि अशुभ ग्रहांची व्याख्या अजुनही देत आहे.. हे सगळं अजब आहे...नरेंद्र दाभोळकर कोणत्या राशीचे होते? का त्यांची अजून कोणती १३वी रास होती "so called साधुसंतां"च्या मागे लागणारी? ते काही असो पण त्यांचा कोणता तरी ग्रह नक्की वक्री असणार किंवा त्यांना शिनीची साडेसाती चालू असणार... खरंच असंच असेल का? असो...

शेवटी माणूस म्हणून आणि समाजप्रिय प्राणी म्हणून आपण इतर कोणाच्या राशीला न जाणे ह्यातच शहाणपण आहे...

-मंगेश केळकर
(८-नोव्हेंबर-२०१३)

Thursday, August 29, 2013

घसरण... मूल्याची की मूल्यांची...

कोण म्हणतंय रुपया पडतोय? सर्व अर्थशास्त्र पंडितांनी जरा नीट अभ्यास करायला हवा... त्यांना म्हणावं जरा इकडच्या दहीहंड्या बघा... जसजसे हंडीचे थर वाढतायत तसतसा रुपया पण वाढतोय... कुठे १० लाख, कुठे २० लाख, कुठे ३० लाख... आमच्याकडे तर पैसा पाण्यासारखा वाहतोय... आपल्याकडील सर्व राजकीय पक्ष आज एवढे सबळ आहेत की खरं तर डॉलरच पडू शकेल... संपत्तीचा पुरेपूर वापर कसा आणि कुठे करावा हे ह्याचं एक अत्यंत चांगलं उदाहरण आहे... बघा नं, इथे खरंच कसा पूर आला आहे पैशाचा...



मला खरंच अभिमान वाटतो आपण किती समृध्द आहोत ह्याचा... सगळ्याच बाबतीत... पैसा तर आहेच पण सांस्कृतिक समृध्दता सुद्धा भरभरून वाहत आहे... आणि ते सुद्धा २१ व्या शतकात राहतो ह्याचा विसर न पडता... आपली संस्कृती पुढे मागे एवढी समृद्ध होईल असा विचार साक्षात भगवान श्रीकृष्णाने पण केला नसेल... आता हेच बघा ना, शीला की जवानी किंवा तेरा प्यार हुक्का बार यांसारखे सुप्रसिद्ध नृत्याविष्कार चालू असताना गोविंदा हंडी फोडतात... आपली संस्कृती आणि २१ व्या शतकातील सगळ्या मॉडर्न गोष्टी ह्यांचं खरंच एक अनोखं Fusion बघायला मिळतं...

फुले, आगरकर, रानडे असे हे सगळे आज जर आपल्यात असते तर त्यांना खरंच अभिमान वाटला असता आपल्या सगळ्यांचा... एवढे सगळे समाजसुधारक जन्माला आलेले बघून आणि त्यांनी केलेली आधुनिक समाजाची जडणघडण बघून त्यांना स्वत:चीच लाज वाटली असती... खरे महान कार्य तर आत्ताची नवीन पिढी करते आहे असंच त्यांचंही मत झालं असतं... एकत्र येऊन असे सामाजिक सोहळे साजरे करावे, अश्या सोहळ्यांमध्ये एखादा तमाशाचा फड किंवा मद्यविक्री केंद्र चालू करावे जेणेकरून अधिकाधिक जनसमुदाय जमा करता होईल आणि जनजागृती करणे अधिक सुलभ होईल ही खरंच किती चांगली कल्पना आहे असंच त्यांनाही वाटलं असतं...

परवा म्हणे दोन बालिकांवर जबरदस्ती केली गेली आणि ते पण भर वस्ती मध्ये, चारचौघांसमोर... पण अहो वस्त्रहरण द्रौपदीचा पण झालं होतच की १०० कौरवांसमोर आणि दरबारातील ऋषीमुनींसमोर... काही दिवसांपूर्वी नरेंन्द्र दाभोळकर नामक व्यक्तीवर हल्ला केला गेला आणि हत्या केली गेली... पण अहो ३३ कोटी देवांची भक्ती करणा-या कित्येक कोटी साधु-संतांच्या विरोधात गेल्यावर दुसरे अजुन काय होणार... अहो ते साधुसंत आपल्यासारख्या भोळ्याभाभड्या लोकांना साक्षात देव दर्शन घडवतात...

असो, माझं ही अशी मतं ऐकून माझी अर्धांगिनी मला म्हणाली "कोकणस्थ आहोतच पण तू आता झालास हो पक्का पुणेकर"... मला २ मिनिटं खरंच वाटलं आपण टोमणे वगैरे मारतोय की काय... पण मग मनाची समजूत काढली... माझ्या नाही बायकोच्या... :-) :-)

-मंगेश केळकर
(२९ ऑगस्ट २०१३)

Monday, August 15, 2011

चला पुन्हा एक होऊया आणि जग जिंकुया...

 आज १५ ऑगस्ट.. ६५ वा स्वातंत्र्यदिन.. Independence Day चा Counter वाढला..
एवढी वर्ष उलटून गेली, एवढ्या गोष्टी घडून गेल्या, तरी अजुन १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारी म्हटलं की पुन्हा पुन्हा त्याच जुन्या गोष्टी चघळण्यास सुरूवात होते..


आज रस्त्यांवर तिरंगा विकणारी माणसं आणि उद्या १६ ऑगस्टला त्याच तिरंग्यांचा रस्त्यावर झालेला कचरा उचलणारी मणसं हे चित्र भारतीयांसाठी काही नवीन नाही.. TV वरच्या प्रत्येक कार्यक्रमातही देशभक्ती वाहू लागते.. खरंच बाकीचे ३६४ दिवस आपल्याला देशभक्ती आठवत नाही का?

रस्त्यावर ठिकठिकाणी झेंडावंदन, ते पण कोणत्या तरी political party तर्फे.. बाजूला पार्टी आणि त्या पार्टीच्या नेत्याच्या नावाचं होर्डिंग मात्र नक्की असतं.. बहुतांशी सार्वजनिक ध्वजारोहण सोहळे हे राजकीय पक्षाच्या नेत्यांकडूनच का केले जातात हे एक कोडंच आहे..

भगतसिंग, सुखदेव, टिळक, आगरकर अश्या थोरामोठ्यांबद्दल काहीही माहित नसताना दुस-यांनी लिहीलेली आणि १ दिवस पाठांतर करून दिलेली भाषणं ऐकून वीट आलाय.. पण अश्या स्वातंत्र्यसैनिकांबद्दल बोलताना त्यांनी केलेल्या कार्याची आणि बलिदानाची जाणीव खरंच असते का?

पुरातनकाळापासून चालत आलेली देशभक्तीपर गीते.. दरवर्षी तीच तीच ऐकून त्यांचाही कंटाळा आलाय.. पण मग आज काल देशभक्तीपर गीते का होत नाहीत? ह्याचं कारण खरंतर शोधायला हवं.. ह्या आणि अश्या अनेक गोष्टी आपल्या अंगवळणी पडल्या आहेत..

आज काल तर काय म्हणे १५ ऑगस्टच्या दिवशी Red Alert आणि High Security असते.. हे तर म्हणजे स्वातंत्र्यदिनीसुध्दा पारतंत्र्यात असल्याची जाणीव करून देण्यासारखं आहे.. फक्त १५ ऑगस्टच्या दिवशी high security ठेवली म्हणजे आपला देश खरंच सुरक्षित आहे / राहतो का? अश्या महत्त्वाच्या दिवशी High Security आणि Red Alert का द्यावा लागतो ह्याची करणं आधी शोधायला हवीत..

माझ्यात तेवढी कुवत नाही आणि ताकदही नाही कि ह्या सगळ्या गोष्टींची कारणमिमांसा करता येईल.. पण खारीचा वाटा उचलण्याची आणि तो पेलण्य़ाची क्षमता नक्कीच आहे.. ६४ वर्षांनंतरही आपल्या देशाला खरंच स्वातंत्र्य मिळालंय असं काही वाटत नाही.. पण ह्या पुन्हा जन्माला आलेल्या स्वातंत्र्य लढ्यात मेधा पाटकर आणि अण्णा हजारेंसारख्यांना माझी साथ नक्कीच असेल ह्यात दुमतही नाही..


चला पुन्हा एक होऊया आणि जग जिंकुया.. खरं तर आधी आपल्याला आपली माणसं जिंकायची आहेत.. ती जिंकली की जग सारं आपलंच आहे.. Let's Unit and Fight Against All Bad Tendancies and False Values in the society..
ह्या वेळी मला आमची एक प्रार्थना आठवते.. नववीत असताना आमच्या सहस्त्रबुद्धे बाईंनी शिकवली होती. आम्ही ती रोज म्हणायचो.. पण त्याचा खरा अर्थ आत्ता लागतोय..

                                   We stand as one family
                                   Bound to each other with love and respect.

                                   We serve as an army,
                                   Courageous and disciplined
                                   Ever ready to fight against all low tendencies and false values
                                   Within and without us.

                                   We live honestly
                                   The noble life of sacrifice and service.
                                   Producing more than what we consume
                                   and giving more than what we take.

                                   We seek the Lord's grace
                                   To keep us on the path of virtue, courage and wisdom.

                                   May Thy grace and blessings flow
                                   through us to the world around us.

                                   We believe that the service of our country
                                   is the service of the Lord of Lords,
                                   and the devotion to the people
                                   is the devotion to the Supreme Self.

                                   We know our responsibilities,
                                   give us the ability and courage to fulfill them.


                                   OM    TAT   SAT !!!
                                 
                                   ( A Prayer by Chinmay Mission...!!! )

-मंगेश केळकर
(१५ ऑगस्ट २०११)