Thursday, August 29, 2013

घसरण... मूल्याची की मूल्यांची...

कोण म्हणतंय रुपया पडतोय? सर्व अर्थशास्त्र पंडितांनी जरा नीट अभ्यास करायला हवा... त्यांना म्हणावं जरा इकडच्या दहीहंड्या बघा... जसजसे हंडीचे थर वाढतायत तसतसा रुपया पण वाढतोय... कुठे १० लाख, कुठे २० लाख, कुठे ३० लाख... आमच्याकडे तर पैसा पाण्यासारखा वाहतोय... आपल्याकडील सर्व राजकीय पक्ष आज एवढे सबळ आहेत की खरं तर डॉलरच पडू शकेल... संपत्तीचा पुरेपूर वापर कसा आणि कुठे करावा हे ह्याचं एक अत्यंत चांगलं उदाहरण आहे... बघा नं, इथे खरंच कसा पूर आला आहे पैशाचा...मला खरंच अभिमान वाटतो आपण किती समृध्द आहोत ह्याचा... सगळ्याच बाबतीत... पैसा तर आहेच पण सांस्कृतिक समृध्दता सुद्धा भरभरून वाहत आहे... आणि ते सुद्धा २१ व्या शतकात राहतो ह्याचा विसर न पडता... आपली संस्कृती पुढे मागे एवढी समृद्ध होईल असा विचार साक्षात भगवान श्रीकृष्णाने पण केला नसेल... आता हेच बघा ना, शीला की जवानी किंवा तेरा प्यार हुक्का बार यांसारखे सुप्रसिद्ध नृत्याविष्कार चालू असताना गोविंदा हंडी फोडतात... आपली संस्कृती आणि २१ व्या शतकातील सगळ्या मॉडर्न गोष्टी ह्यांचं खरंच एक अनोखं Fusion बघायला मिळतं...

फुले, आगरकर, रानडे असे हे सगळे आज जर आपल्यात असते तर त्यांना खरंच अभिमान वाटला असता आपल्या सगळ्यांचा... एवढे सगळे समाजसुधारक जन्माला आलेले बघून आणि त्यांनी केलेली आधुनिक समाजाची जडणघडण बघून त्यांना स्वत:चीच लाज वाटली असती... खरे महान कार्य तर आत्ताची नवीन पिढी करते आहे असंच त्यांचंही मत झालं असतं... एकत्र येऊन असे सामाजिक सोहळे साजरे करावे, अश्या सोहळ्यांमध्ये एखादा तमाशाचा फड किंवा मद्यविक्री केंद्र चालू करावे जेणेकरून अधिकाधिक जनसमुदाय जमा करता होईल आणि जनजागृती करणे अधिक सुलभ होईल ही खरंच किती चांगली कल्पना आहे असंच त्यांनाही वाटलं असतं...

परवा म्हणे दोन बालिकांवर जबरदस्ती केली गेली आणि ते पण भर वस्ती मध्ये, चारचौघांसमोर... पण अहो वस्त्रहरण द्रौपदीचा पण झालं होतच की १०० कौरवांसमोर आणि दरबारातील ऋषीमुनींसमोर... काही दिवसांपूर्वी नरेंन्द्र दाभोळकर नामक व्यक्तीवर हल्ला केला गेला आणि हत्या केली गेली... पण अहो ३३ कोटी देवांची भक्ती करणा-या कित्येक कोटी साधु-संतांच्या विरोधात गेल्यावर दुसरे अजुन काय होणार... अहो ते साधुसंत आपल्यासारख्या भोळ्याभाभड्या लोकांना साक्षात देव दर्शन घडवतात...

असो, माझं ही अशी मतं ऐकून माझी अर्धांगिनी मला म्हणाली "कोकणस्थ आहोतच पण तू आता झालास हो पक्का पुणेकर"... मला २ मिनिटं खरंच वाटलं आपण टोमणे वगैरे मारतोय की काय... पण मग मनाची समजूत काढली... माझ्या नाही बायकोच्या... :-) :-)

-मंगेश केळकर
(२९ ऑगस्ट २०१३)